नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : ऑस्ट्रेलियाचे माजी क्रिकेटपटू डिन जोन्स यांचं आज मुंबईत हृदयविकारानं निधन झालं. ते ५९ वर्षांचे होते. १९८७ साली विश्वचषक स्पर्धा जिंकणा-या ऑस्ट्रेलियाच्या क्रिकेट संघात त्यांचा समावेश होता. त्यांनी आपल्या कारकिर्दित ५२ कसोटी सामने आणि १६४ एकदिवसीय सामने खेळले.

निवृत्तीनंतर क्रिकेटच्या विकासासाठी दक्षिण आशिया क्षेत्रात त्यांनी मोठं काम केलं. आयपीएल अर्थात, इंडियन प्रिमीअर लीगच्या समालोचनासाठी ते मुंबईत आले होते. त्यांच्या निधनाबद्दल राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी दुःख व्यक्त केलं आहे. डीन जोन्स यांचे मुंबई येथे आकस्मिक निधन झाल्याचे समजून अतिशय वाईट वाटले.

आपल्या शोकसंवेदना त्यांच्या कुटुंबियांना आणि त्यांच्या चाहत्यांना कळवतो, असे राज्यपालांनी आपल्या शोकसंदेशात म्हटले आहे. वीरेंद्र सेहवाग, विराट कोहली यांच्यासह क्रिकेट क्षेत्रातल्या अनेक मान्यवरांनी डीन जोन्स यांच्या निधनाबद्दल दुःख व्यक्त केलं आहे.