मुंबई (वृत्तसंस्था) : महसूल विभागानं नागरिकांना संगणकीकृत सातबारा नव्या स्वरूपात उपलब्ध करून दिला आहे, आता दोन ऑक्टोबर अर्थात गांधी जयंतीपासून या सुधारित सातबारा उताऱ्याची पहिली प्रत थेट खातेदाराच्या हातात द्यायचा निर्णय महसूल विभागानं घेतला आहे. महसूल मंत्री बाळासाहेब थोरात यांनी काल अहमदनगर जिल्ह्यात श्रीरामपूर ही घोषणा केली. हा आधुनिक सातबारा उतारा शेतकऱ्यांना समजण्यास सोपा आणि बिनचूकही आहे. त्याचं हे आधुनिक स्वरूप खातेदारांना माहित व्हावं यासाठी त्यांना खाते उताराची पहिली प्रत घरपोच आणि मोफत दिली जाणार आहे, असं थोरात यांनी सांगितलं. महसूल विभागानं ई पीक पाहणी, संगणकीकृत सातबारा, ऑनलाइन फेरफार, जलद गतीनं जमिनींची मोजणी, सामूहिक गावठाण मोजणी असे अनेक आधुनिक उपक्रम हाती घेतले आहेत. त्याचाच एक भाग म्हणून महसूल विभागानं सातबारा उताऱ्यात नाविन्यपूर्ण बदल केले आहेत. तो सातबारा उतारा ऑनलाईनही उपलब्ध करून दिला आहे. पुढच्या काळात फेरफार दाखलाही ऑनलाईन उपलब्ध करून देण्याचा प्रयत्न आहे. जनतेला अधिक जलद आणि बिनचूक सेवा देताना त्यांना मनस्ताप होणार नाही याची काळजी घेण्याच्या स्पष्ट सूचना महसूल यंत्रणेला दिल्या आहेत, असं त्यांनी सांगितलं.