नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : यंदा 60 लाख हेक्टर क्षेत्रावर रब्बी हंगामाचं नियोजन केलं आहे. त्यासाठी लागणारं बियाणं आणि खतं मुबलक प्रमाणात उपलब्ध करुन दिली आहेत, असं कृषीमंत्री दादाजी भुसे यांनी सांगितलं. ते काल पुण्यात कृषी आयुक्तालयात रब्बी हंगाम 2021 राज्यस्तरीय नियोजन आणि आढावा बैठकीत बोलत होते.‘शेतकरी योजना‘ या सदराखाली सर्व योजनांचा लाभ ‘एकाच अर्जाद्वारे‘ देण्याच्या दृष्टीनं, महा-डीबीटी पोर्टलवर, अर्ज करण्यापासून ते प्रत्यक्ष लाभ मिळेपर्यंत प्रणाली विकसित केली आहे, असं त्यांनी सांगितलं.प्रधानमंत्री पीक विमा योजनेसंदर्भात अस्तित्वात असलेल्या नियमांचं पालन करण्याच्या सूचना दिल्या आहेत. मात्र या नियमांमध्ये काही बदल केले पाहिजेत याबाबत केंद्र शासनाकडे मागणी केली आहे. तसनच ”बीड पॅटर्न” राज्यात राबवण्याबाबत केंद्र शासनाला विनंती केली होती, त्याला केंद्रानं अद्याप मान्यता दिलेली नाही, असं त्यांनी सांगितलं. यावेळी फलोत्पादन मंत्री संदिपान भुमरे, आणि कृषी राज्यमंत्री विश्वजीत कदमही उपस्थित होते. द्राक्ष, केळी आणि ड्रॅगनफ्रुट या फळांचा रोजगार हमी योजनेत समावेश केला आहे. या वर्षात फळबाग लागवडीसाठी प्रति कृषि सहायक 10 हेक्टर क्षेत्रावर फळबाग लागवडीचा लक्ष्यांक निश्चित करुन दिला असून, राज्यात 18 हजार 235 हेक्टर क्षेत्रावर लागवड केली आहे, अशी माहिती संदिपान भुमरे यांनी यावेळी दिली.