मुंबई (वृत्तसंस्था) : राष्ट्रीय पोषण महिन्यानिमित्त नंदुरबार जिल्ह्यात केंद्र शासनाच्या कुपोषण मुक्त भारताच्या चार संकल्पना राबवल्या जात आहेत. त्याअंतर्गत महिला आणि बाल कल्याण विभागानं पाडळदा गावात विविध उपक्रमांचं आयोजन केलं होतं. पोषण आहाराबाबतच्या जनजागृती रॅलीत अंगणवाडी सेविका, आशा वर्कर, आरोग्य कर्मचारी, विद्यार्थिनीं, ग्रामपंचायत सदस्य आदींचा सहभाग होता. यावेळी अंगणवाडी आणि शाळा परिसरातल्या पोषण वाटिकेत  शेवगा आणि लिंबू या पोषण रोपांची लागवड करण्यात आली. जिल्ह्यात अमृत आहार योजना प्रभावीपणे राबवली जात आहे. गरोदर महिला आणि स्तनदा मातांना अंगणवाडीत बोलावून दररोज नियमीत पणे आहाराचा डब्बा, तसंच बालकांना पौष्टिक आहार दिला जात आहे. त्यांचं पोषण आणि आरोग्यांची काळजी कशी घ्यावी याची माहिती देण्यासाठी गरोदर महिला आणि स्तनदा मातांचा मेळावाही आयोजित केला होता.