मुंबई (वृत्तसंस्था) : राज्यसभा सदस्यांच्या मृत्यू किंवा राजीनाम्यामुळे रिक्त झालेल्या ६ जागांसाठी भारतीय निवडणूक आयोगानं निवडणूक कार्यक्रम जाहीर केला आहे. यात महाराष्ट्रातले राज्यसभा सदस्य राजीव सातव यांच्या निधनामुळे रिक्त झालेल्या जागेचा समावेश आहे. याशिवाय पश्चिम बंगाल, आसाम आणि मध्यप्रदेशातल्या प्रत्येकी एका, तर तमीळनाडूतल्या दोन जागांसाठीही निवडणूका होतील.

या निवडणुकांसाठी येत्या १५ सप्टेंबरला अधिसूचना जारी होईल. २२ सप्टेंबर ही निवडणुकीसाठी अर्ज दाखल करायची शेवटची तारीख असेल, तर २७ सप्टेंबरपर्यंत अर्ज माग घेता येणार आहेत. यानंतर ४ ऑक्टोबरला, सकाळी ९ ते ४ या वेळेत प्रत्यक्ष निवडणुकीसाठी मतदान होणार आहे. तर त्याच दिवशी संध्याकाळी ५ वाजता मतमोजणीला सुरुवात होणार आहे.

निवडणुकीची सगळी प्रक्रिया ६ ऑक्टोबर २०२१ पर्यंत पूर्ण केली जाईल असं, निवडणूक आयोगाच्या निवेदनात म्हटलं आहे.