नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : राष्ट्रीय संस्थात्मक मानांकनाच्या यादीत आयआयटी मद्रासनं पहिला क्रमांक पटकावला असून बंगळुरूची भारतीय विज्ञान संस्था दुसऱ्या क्रमांकावर आहे तर या क्रमवारीत आयआयटी मुंबईचा तिसरा क्रमांक आहे.

सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ या क्रमवारीत अकराव्या स्थानावर आहे. केंद्रीय शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांनी ही 2021 साठीची क्रमवारी काल जाहीर केली. अभियांत्रिकी, औषधशास्त्र, व्यवस्थापन आणि संशोधन अशा विविध क्षेत्रांमधल्या संस्थांचा या क्रमवारीत समावेश आहे.

शिकवण्याची आणि शिकण्याची पद्धती आणि संसाधनं, संशोधन आणि प्रात्यक्षिकं, शिक्षणासाठीचा दृष्टिकोन आणि त्याची सर्वसमावेशकता यांच्या आधारे ही क्रमवारी लावण्यात आली. सर्व संस्थांची क्रमवारी nirfindia.org या संकेतस्थळावर पाहता येणार आहे.