मुंबई (वृत्तसंस्था) : राज्यात कालपासून पावसाचा जोर वाढला आहे. काल कोकणात सर्वत्र, विदर्भात अनेक ठिकाणी, मध्य महाराष्ट्रात काही तर मराठवाड्यात तुरळक ठिकाणी पाऊस पडेल, असा अंदाज वर्तवण्यात आला होता. प्रत्यक्षात कोकण आणि विदर्भात सर्वत्र तर मध्य महाराष्ट्रात अनेक ठिकाणी दमदार पाऊस झाला. मराठवाड्यात मात्र पावसाची हजेरी तुरळक ठिकाणीच होती. सकाळपर्यंतच्या २४ तासात राज्यात सर्वाधिक गडचिरोलीत १०० मिलिमीटर पावसाची नोंद झाली तर त्या खालोखाल ८० मिलिमीटर पावसाची नोंद पुण्यात झाली. आजही राज्यात पावसाचा जोर काहीसा असाच राहील, असा हवामान विभागाचा अंदाज आहे. येत्या दोन दिवसात मराठवाड्यातही सर्वत्र पाऊस अपेक्षित आहे. कोकण, मध्य महाराष्ट्र आणि विदर्भात काही ठिकाणी मुसळधार वृष्टी होऊ शकते. कोकणात तुरळक ठिकाणी अतिवृष्टीचा इशाराही हवामान विभागानं दिला आहे.