नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : युरोपीय आयोगाच्या आरोग्य प्राधिकरणानं ‘मंकीपॉक्स’ या आजाराला रोखण्यासाठी स्पेन देशात पहिल्या टप्प्यात पाच हजार तीनशे लसी पाठवल्या आहेत. मंकीपॉक्स या आजारानं सर्वाधिक संक्रमित देशांना पुरेशा लसी पुरवण्यात येत असून स्पेन नंतर पोर्तुगाल, जर्मनी आणि बेल्जीयम या देशांना देखील लसी पुरवल्या जातील, असं युरोपीय आयोगाच्या आरोग्य आणि खाद्य सुरक्षा आयुक्त स्टेला काइराकाइड्स यांनी सांगितलं. युरोपीय संघातल्या २७ मधल्या २३ देशात यावर्षीच्या १८ मे पासून या आजारानं बाधित एकूण दोन हजार ६८२ रुग्ण सापडले आहेत. मंकीपॉक्स हा आजार आधी पशूंमार्फत संक्रमित होतो त्यानंतर माणसाकडून माणसांमध्ये पसरतो.