नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : अमरनाथ यात्रेसाठी भाविकांचा पहिला जत्था आज जम्मू काश्मीर मधील भगवती नगर जवळील बेस कॅम्प मधून रवाना झाला. जम्मू काश्मीरचे नायब राज्यपाल मनोज सिन्हा यांनी  भाविकांच्या जत्थ्याला हिरवा झेंडा दाखवला.  ४३ दिवस चालणाऱ्या या यात्रेची सांगता ११ ऑगस्ट रोजी  श्रावण पौर्णिमेला अर्थात रक्षाबंधनाच्या दिवशी होणार आहे. पृथ्वीवरचं नंदनवन समजल्या जाणाऱ्या काश्मिरमधली ही सर्वात मोठी धार्मिक यात्रा असून, दरवर्षी सुमारे ६ ते ८ लाख यात्रेकरु अमरनाथला भेट देतात. गेली दोन वर्ष ही यात्रा झाली नव्हती. ४३ दिवस चालणाऱ्या यात्रेकरता वाहतूक, आरोग्य, संपर्क, स्वच्छता अशा विविध सोयी सुविधा प्रशासन आणि श्री अमरनाथ श्राईन बोर्डातर्फे पुरवण्यात येतात. यात्रेकरुंच्या सुरक्षेकरिता देखरेखीची विशेष यंत्रणा यंदा कार्यान्वित करण्यात आलेली असून, अमरनाथ गुंफेपर्यंतचा पूर्ण मार्ग त्यामुळे नजरेखाली ठेवता येईल.

गेली दोन वर्ष कोविडच्या पार्श्वभूमीवर ही यात्रा रद्द करण्यात आल्यानं या वर्षी भाविकांमध्ये उत्साहाचं वातावरण दिसून येत आहे.  यात्रेकरूंच्या सुरक्षिततेसाठी शासन यंत्रणा सज्ज झाली असून यात्रेच्या मार्गावर  केंद्रीय राखीव पोलीस दल आणि सशस्त्र पोलिसांच्या तुकड्या तैनात करण्यात आल्या आहेत. यात्रेकरूंच्या सुरक्षेच्या दृष्टीनं गृहमंत्रालय आणि जम्मू काश्मीर प्रशासनानं भाविकांच्या  कोणत्याही एकट्या दुकट्या वाहनाला या भागात  प्रवासाची परवानगी नाकारली आहे.  यात्रेकरूंच्या शांततापूर्ण , समाधानकारक आणि  सुरक्षित अध्यात्मिक प्रवासासाठी उपराज्यपाल मनोज सिन्हा यांनी प्रार्थना केली.