नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या हस्ते आज नवी दिल्लीत प्रगती मैदानावर ‘पी एम गतिशक्ति’ या योजनेचा प्रारंभ झाला. या महत्वाकांक्षी योजनेच्या केंद्रस्थानी भारतीय नागरिक, भारतीय उद्योग असल्याचं प्रधानमंत्री मोदी यांनी याप्रसंगी बोलताना सांगितलं. हा राष्ट्रीय बृहत आराखडा एकविसाव्या शतकातल्या भारताच्या प्रगतीला गती देईल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. देशातले प्रकल्प वेळेवर पूर्ण करणारी कार्य संस्कृती केंद्र सरकारनं सुरु केली आहे, काम पूर्ण करण्याचा वेग ही आज भारताची ओळख बनली आहे, असंही ते म्हणाले. या योजनेमुळे देशाचं धोरण ठरवायला मदत होईल, दर्जेदार पायाभूत सुविधामुळे देशाचा शाश्वत विकास होईल, यातूनच अनेक आर्थिक घडामोडी साध्य होतील. आणि रोजगारालाही चालना मिळेल, अशी ग्वाही त्यांनी दिली. विविध विभागांचा आपसात समन्वय नसल्यानं अनेक प्रकल्पाची गती खुंटते, हे लक्षात घेऊन ही योजना सुरु केल्याचं प्रधानमंत्री म्हणाले. १६ मंत्रालयांचा यात सहभाग असेल. राज्यांनीही या योजनेमध्ये लवकरात लवकर सहभागी व्हावं, असं आवाहन त्यांनी केलं. प्रगती मैदानावरच्या ४ प्रदर्शन दालनांचं लोकार्पणही आज प्रधानमंत्र्यांच्या हस्ते झालं. भारतीय उत्पादनं जागतिक बाजारपेठेपर्यंत पोहोचवण्यासाठी या दालनांचा उपयोग होईल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. नितीन गडकरी, पियुष गोयल, धर्मेंद्र प्रधान आणि इतर केन्द्रीय मंत्री यावेळी उपस्थित होते. ही योजना म्हणजे सर्वसमावेशक प्रशासनाचा विस्तार असल्याचं त्यांनी सांगितलं