नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : भारत हा नव्या विचार आणि कल्पनांना महत्व देणारा आणि नव्या भारताच्या निर्मितीसाठी नाविन्यपूर्ण उपक्रमांना प्राधान्य देणारा देश आहे असं माहिती आणि प्रसारणमंत्री अनुराग ठाकूर यांनी म्हटलं आहे. स्वामी विवेकानंद यांनी शिकागो इथं केलेल्या ऐतिहासिक भाषणाच्या १२८व्या वर्षपूर्तीनिमीत्त, ठाकूर यांनी काल जवाहरलाल नेहरू विद्यापीठातल्या विद्यार्थ्यांना संबोधित केलं. भारताला आपल्या परंपरा आणि वारसाचा अभिमान आहे, आणि त्याचवेळी भारत हा भविष्याच्या दिशेने वाटचाल करणारा देश आहे असं ते म्हणाले. स्वामी विवेकानंद यांच्या ऐतिहासिक भाषणानं पहिल्यांदाच अधात्मिक पटलावर पूर्वेकडच्या आणि पाश्चिमात्य देशांमधल्या संवादाचा मार्ग प्रशस्त केला असं ते म्हणाले. भारताला २१व्या शतकाला सर्वात मोठा कौशल्यधारीत मनुष्यबळ असलेला देश बनवण्यासाठी विद्यार्थ्यांनी सातत्यानं आपल्यातली कौशल्य विकसित करत राहायला हवं असं आवाहन त्यांनी केलं.