नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या ७१व्या वाढदिवसानिमित्त राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांनी त्यांचं अभीष्टचिंतन केलं आहे. मोदी यांना उत्तम आयुरारोग्य लाभो अशी कामना व्यक्त करुन त्यांनी ट्विटर संदेशात म्हटलंय की देशाची अहर्निश सेवा करण्याचं व्रत मोदी यापुढंही आचरतील.उपराष्ट्रपती एम वेंकय्या नायडू यांनी प्रधानमंत्र्यांना दीर्घ, निरोगी आणि आनंदी आयुष्य लाभावं अशा शुभेच्छा देताना म्हटलंय की मोदी यांची दूरदृष्टी, सक्षम नेतृत्व आणि निरलस सेवा यामुळेच देशाची सर्वांगीण प्रगती होत आहे. केंद्रीय गृहमंत्री अमित शहा, माहिती आणि प्रसारण मंत्री अनुराग ठाकूर, यांनीही मोदी यांना शुभेच्छा दिल्या आहेत. उपमुख्यमंत्री अजित पवार यांनीही प्रधानमंत्र्यांना वाढदिवसानिमित्त शुभेच्छा दिल्या आहेत.
प्रधानमंत्र्याच्या वाढदिवसानिमित्त विविध राज्यांमध्ये लसीकरण मोहीम, कोविड योद्ध्यांचा सन्मान असे कार्यक्रम आयोजित करण्यात आले आहेत. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या ७१ व्या वाढदिवसानिमित्त गुजरातमध्ये भाजपनं विविध कार्यक्रमांचं आयोजन केलं आहे. राज्यात ७१ ठिकाणी होमहवन, वृक्षारोपण आणि रक्तदान शिबीरांचं आयोजन करण्यात आलं आहे. भाजपकडून हा दिवस सेवा समर्पण अभियान म्हणून साजरा केला जाणार आहे. आजच्या दिवशी राज्यात ३५ लाख जणांना लस देण्याचं उद्दिष्ट राज्य सरकारनं ठरवलं आहे. कामगार आणि गरीब कुटुंबांना आरोग्य सुरक्षा देण्यासाठी विशेष मोहीमही आजपासून राबवण्यात येणार आहे. दरम्यान, प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी देशातल्या जनतेला मोफत लस उपलब्ध करून दिल्यानं आज त्यांच्या वाढदिवसानिमित्त त्यांना भेट म्हणून ज्यांनी लस घेतली नसेल, त्यांनी आवर्जून घ्यावी, असं आवाहन केंद्रीय आरोग्य मंत्री मनसुख मांडवीय यांनी काल केलं.