मुंबई (वृत्तसंस्था) : मराठवाड्याचा कायापालट घडवणाऱ्या प्रकल्पांची वेळेत अंमलबजावणी करण्याची ग्वाही मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी दिली आहे. ते आज मराठवाडा मुक्तिसंग्राम दिनानिमित्त औरंगाबाद इथं सिद्धार्थ उद्यानातल्या हुतात्मा स्मारक परिसरात ध्वजारोहण झाल्यानंतर बोलत होते. निझामकालीन १५० शाळांचा पुनर्विकास करुन नवं रुप देणं, औरंगाबाद अहमदनगर रेल्वेमार्ग, उस्मानाबाद वैद्यकीय महाविद्यालय, औरंगाबाद इथं सिंथेटीक ट्रॅक, शिर्डी-औरंगाबाद हवाई मार्ग, परभणी पाणीपुरवठा योजना, हिंगोली हळद प्रक्रिया उद्योग, मराठवाड्यात २०० मेगावॉट सौर ऊर्जा प्रकल्प, घृष्णेश्वर मंदिर सभामंडप, औंढा नागनाथ, नरसी नामदेव मंदिराच्या परिसराचा विकास आदी विकास कामांचा यात समावेश आहे. औरंगाबाद जिल्हा परिषदेच्या नवीन इमारतीचं भूमिपूजनही मुख्यमंत्र्यांच्या हस्ते झालं. जिल्हा परिषद इमारत केवळ आकर्षक आणि देखणी झाली पाहिजे असं नाही, तर सेवेचा दर्जाही उत्कृष्ट असला पाहिजे, असं ते यावेळी म्हणाले.