नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : शांघाय सहकार्य संघटनेपुढं उभ्या असलेल्या समस्यांचं मूळ कारण वाढत्या मूलत्त्ववादात आहे, असं प्रतिपादन प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी केलं आहे. शांघाय सहकार्य संघटनेतल्या राष्ट्रप्रमुखांची २१ वी परिषद आज ताजिकीस्तानची राजधानी दुशांबे इथं सुरु झाली. या परिषदेला मोदी दूरदृश्य प्रणालीद्वारे संबोधित करत होते. मूलत्त्ववादाचं आवाहन अफगाणिस्तानातल्या अलिकडच्या घडामोंडीनी अधिक स्पष्ट केलं आहे, असं ते म्हणाले. शांती, सुरक्षा आणि विश्वास यांच्यातली कमतरता हे सर्वात मोठं आवाहन आहे. मूलत्त्ववादाविरोधात लढणं हे केवळ सुरक्षिततेच्याच नव्हे तर तरुण पिढीच्या उज्वल भविष्याची खातरजमा करण्याच्या दृष्टीनंही गरजेचं आहे, ऐतिहासिक दृष्टया मध्य आशिया हा मध्यममार्गी तसंच प्रागतिक संस्कृती आणि मूल्यांना मानणारा प्रदेश आहे. सुफी पंथासारख्या परंपरा किती वर्षानुवर्ष विकसित होत राहिल्या. इस्लामशी संबंधित या मध्यममार्गी, सहिष्णु, सर्वसमावेशक, परंपरा आणि संस्थामधे एक मजबूत जाळं तयार करण्यासाठी शांघाय सहकार्य परिषदेनं काम केलं पाहिजे, असं प्रधानमंत्री म्हणाले. मध्य आशिय़ातले देश भारतीय बाजारपेठेशी जोडल्यानं या देशांचा फायदा होईल, म्हणून त्यादृष्टीनं भारत प्रयत्नशील आणि कटीबद्ध आहे, असं त्यांनी सांगितलं.