नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : कोरोना प्रादुर्भावाच्या पार्श्वभूमीवर शाळा उघडण्याबाबतचा निर्णय राज्य सरकार घेतील, त्यांच्या निर्णयात हस्तक्षेप करणार नसल्याचं, सर्वोच्च न्यायालयानं स्पष्ट केलं आहे. कोविड महामारीमुळे बंद असलेल्या देशभरातल्या शाळा पुन्हा सुरु करण्याबाबत राज्यांनी विशिष्ठ कालावधीत निर्णय घ्यावा, याबाबत न्यायालयानं आदेश द्यावेत, अशी मागणी करणारी याचिका दिल्लीतल्या एका विद्यार्थ्यानं केली आहे. त्यावर न्यायालयानं आपलं मत मांडलं. कोविडची स्थिती प्रत्येक राज्यात वेगळी आहे, रुग्णवाढ विचारात घेऊन त्यानुसार खबरदारीची पावलं उचलणं गरजेचं असल्याचं न्यायालयानं म्हटलं आहे. विद्यार्थ्यानं जनहित याचिका दाखल करण्याऐवजी स्वत:च्या अभ्यासावर लक्ष द्यावं, असा सल्लाही खंडपीठानं यावेळी दिला.