मुंबई (वृत्तसंस्था) : राज्यात कोरोना प्रतिबंधक लसीच्या दोन्ही मात्रा घेतलेल्यांची संख्या, आता २ कोटींच्या पुढे गेली असून, या बाबत महाराष्ट्र देशात आघाडीवर आहे. रविवारी संध्याकाळपर्यंत, राज्यात दुसरी मात्रा मिळालेल्यांची संख्या, २ कोटी ६ लाख ७३ हजार ९०८ झाली होती. पहिली मात्रा देण्यात मात्र, उत्तर प्रदेश महाराष्ट्रापेक्षा पुढे आहे. महाराष्ट्रात ५ कोटी २७ लाख ६६ हजार २७९ जणांना पहिली मात्रा देण्यात आली आहे. मुंबईत ३१६ शासकीय लसीकरण केंद्रांपैकी ७३ महानगरपालिका आणि शासकीय केंद्रांवर कोविड प्रतिबंधक लसीकरण सुरु आहे. महानगरपालिकेला पुरेशा लसींचा साठा आज उपलब्ध होण्याची शक्यता असल्यानं सर्व ३१६ केंद्रांवर उद्यापासून लसीकरण सुरु होऊ शकेल, असं महापालिकेनं कळवलं आहे.