नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : लडाखमधील लेह इथं पाच दिवसांचा हिमालयन चित्रपट महोत्सव आयोजित करण्यात आला असून उद्या शुक्रवारी, २४ तारखेला केंद्रीय माहिती आणि प्रसारण मंत्री अनुराग ठाकूर यांच्या हस्ते त्याचं उद्घाटन होणार आहे. शेरशाह चित्रपटाचे निर्माते आणि कलाकार मंडळी यावेळी उपस्थित राहणार आहेत. हा चित्रपट यावेळी दाखविण्यात येणार असून त्याचे दिग्दर्शक विष्णूवर्धन आणि अभिनेते सिद्धार्थ मल्होत्रा यामध्ये सहभागी होणार आहेत. विविध चित्रपटांच्या प्रदर्शनाबरोबरच या महोत्सवात प्रेक्षकांसाठी कार्यशाळा, प्रशिक्षण वर्ग आणि विविध स्पर्धांचं आयोजनही करण्यात येणार आहे. चित्रपट निर्मिती महासंचालनालय आणि केंद्रीय माहिती आणि प्रसारण मंत्रालय यांच्या संयुक्त विद्यमानं या महोत्सवाचं आयोजन करण्यात आलं आहे.