मुंबई (वृत्तसंस्था) : महानगरपालिका आणि नगरपरिषदांमध्ये एकसदस्यीय प्रभाग पध्दतीऐवजी बहुसदस्यीय प्रभाग पध्दत सुरु करण्याचा निर्णय आजच्या राज्य मंत्रिमंडळ बैठकीत झाला. नागरी स्थानिक संस्थांमधील नागरिकांच्या मागास प्रवर्गाच्या आरक्षणासंदर्भात प्रमाण निश्चिती,अधिनियमात सुधारणा करण्याचा निर्णय ही घेण्यात आला.महाराष्ट्रातील साखर उद्योगाच्या विकासाची वाटचाल मांडण्यासाठी साखर संग्रहालय उभारणार असल्याचा निर्णय ही या बैठकीत झाला. राज्यात काल पर्यंत सुमारे ३६ लाख कोरोना प्रतिबंधक लसीच्या मात्रा शिल्लक असून ज्या जिल्ह्यांत कमी मात्र दिल्या असतील त्यांनी लसीकरणाचा वेग मोठ्या प्रमाणावर वाढवावा असे निर्देश मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी मंत्रिमंडळ बैठकीत दिले. रुग्ण संख्या कमी होत असली तरी आरोग्याचे नियम पाळण्यात बेफिकिरी नको असं मुख्यमंत्र्यांनी स्पष्ट केलं.महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत सरळ सेवा भरतीसाठी काही विभागांकडून आयोगाला अद्यापपर्यंत मागणीपत्र न सादर झाल्याची गंभीर दखल मुख्यमंत्र्यांनी घेतली.कोणत्याही परिस्थितीत ३० सप्टेंबर २०२१ पर्यंत सर्व विभागांनी मंजूर पदांचा आढावा तात्काळ घेऊन आपलं मागणीपत्र आयोगाकडे पाठवावं असे स्पष्ट निर्देश मुख्यमंत्र्यांनी सचिवांना दिले.