मुंबई : सध्याच्या धकाधकीच्या जीवनामुळे आरोग्याकडे दुर्लक्ष होत आहे. त्यामुळे हृदयविकाराचा झटका आलेला देखील काही वेळा समजत नाही. हृदयविकार नेमका कसा ओळखायचा इतपासून ते हृदयविकाराचे प्रकार आणि तातडीचे प्राथमिक उपचार याची माहिती असणे गरजेचे आहे. आणि अशा माहितीसह प्रशिक्षणाचा कार्यक्रम माहिती व जनसंपर्क महासंचालनालयाने ‘आय केअर’ संस्थेच्या सहकार्याने अधिकारी-कर्मचारी तसेच राज्यातील सर्व माध्यमकर्मींसाठी आयोजित केला तो अत्यंत स्तुत्य व अभिनंदनीय आहे, असे गौरवोद्गार माहिती व जनसंपर्क महासंचालनालयाच्या राज्यमंत्री कुमारी आदिती तटकरे यांनी काढले.

आय केअर संस्था आणि माहिती व जनसंपर्क महासंचालनालय यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित केलेल्या राष्ट्रीय अकस्मात हृदयरोग जागरूकता सप्ताहाच्या दूरदृश्यपणालीद्वारे प्रशिक्षण सत्राचे उद्घाटन राज्यमंत्री कु.तटकरे यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी माहिती व जनसंपर्क महासंचालनालयाचे सचिव तथा महासंचालक डॉ.दिलीप पांढरपट्टे, संचालक(प्रशासन) गणेश रामदासी, संचालक(वृत्त) दयानंद कांबळे, आय केअरचे डॉ.यश लोखंडवाला (हृदयरोग तज्ज्ञ), डॉ.ब्रायन पिंटो (कार्डियोलॉजिस्ट), डॉ.किंजल गोयल (मानसोपचारतज्ज्ञ), माहिती व जनसंपर्क महासंचालनालय अंतर्गत राज्यातील अधिकारी-कर्मचारी व पत्रकार ऑनलाईन सहभागी झाले होते.

अल्प व मध्यमवयीन नागरिक सुद्धा या अकस्मात हृदयरोगाला बळी पडत आहेत. हृदयाचा झटका आणि कार्डियाक अरेस्टची घटना आपल्या आजूबाजूला घडत असते तेव्हा अशा प्रकारचे कार्डिओ पल्मोनरी रिसिटेशन (सीपीआर)ची माहिती व प्रशिक्षण असेल तर काही मिनिटाच्या सुवर्णकाळात आपण त्या रुग्णाचे प्राण वाचवू शकतो यासाठी प्राथमिक उपचाराची माहिती असणे आवश्यक आहे. हृदयविकाराचा झटका आणि कार्डियाक अरेस्ट जनजागृतीमुळे नागरिकांचा जीव वाचविण्यास मदत होईल असेही राज्यमंत्री कु.तटकरे यांनी सांगितले.

बदलत्या जीवनशैलीत आरोग्यविषयक जागृत राहणे आवश्यक – डॉ.दिलीप पांढरपट्टे

बदलत्या जीवनशैलीमध्ये तणाव वाढल्याने अनेक रोगांना सामोरे जावे लागत आहे. या धकाधकीच्या जीवनशैलीत आरोग्य विषयक जागृत राहून तणावमुक्त आणि आरोग्यदायी जीवन कसे जगले पाहिजे याचे प्रशिक्षण मिळणे गरजेचे आहे, असे माहिती व जनसंपर्क महासंचालनालयाचे सचिव तथा महासंचालक डॉ.दिलीप पांढरपट्टे यांनी या प्रशिक्षण सत्रांचे प्रास्ताविक करताना सांगितले.

डॉ. पांढरपट्टे म्हणाले की, बदलत्या माध्यमांनुसार आणि माध्यमातील स्पर्धेमुळे पत्रकारांचे आयुष्य धकाधकीचे आणि धावपळीचे झालेले आहे. महासंचालनालयाचे कामही तसे शासकीय परंतु पत्रकारितेचे आहे असे म्हटले जाते. माध्यमातील लोकांना सतत कार्यरत राहून सतर्क रहावे लागते. यामुळे ताण वाढतो त्याने अनेक आरोग्यविषयक समस्या निर्माण होतात. त्यासाठी आरोग्यविषयक जागृत राहणे आवश्यक आहे. हृदयविकाराचा झटका आणि कार्डियाक अरेस्टच्या प्राथमिक उपचारासाठी कार्डिओ पल्मोनरी रिससिटेशन (सीपीआर) हे माहितीपूर्ण प्रशिक्षण आपल्या जवळच्या मित्राचे, नातेवाईकांचे प्राण वाचविण्यास उपयुक्त ठरेल, असा विश्वास त्यांनी यावेळी व्यक्त केला व अशा प्रकारचा जनजागृती व जनसंपर्काच्या कार्यक्रमात सहभागी झाल्याबद्दल सर्वांना धन्यवाद दिले.

हृदयविकाराचा झटका किंवा कार्डियाक अरेस्टची घटना आपल्या अवतीभोवती घडल्यास कशाप्रकारे तातडीने तीन मिनिटांमध्ये चार टप्प्यातील तातडीची वैद्यकीय मदत  केल्यास मृत्यु टाळता येऊ शकतो. यासंदर्भात जनजागृती करण्यासाठी राष्ट्रीय अकस्मात हृदयरोग जागरूकता सप्ताहाच्या निमित्ताने उद्घाटनाचा प्रशिक्षण कार्यक्रम माहिती व जनसंपर्क महासंचालनालयासोबत आय केअरने शनिवारी आयोजला होता.

या प्रशिक्षणामध्ये अचानक हृदयविकाराचा झटका येणाऱ्या पिडितांना वैद्यकीयदृष्ट्या मेंदू मृत होण्यापासून बचाव करण्यासाठी योग्यवेळी सीपीआर (कार्डिओ पल्मोनरी रिससिटेशन) म्हणजेच हाताने हृदयावर दाब देणे शक्य तितक्या लवकर सुरू करणे गरजेचे आहे, सीपीआर आणि शॉक मशीन (एईडी मशीन)चा वापर करण्याचेही प्रशिक्षण दूरदृश्य माध्यमाद्वारे दिले. जेणेकरून आपल्या जवळची व्यक्ती किंवा नातेवाईकाचे प्राण वाचविण्यास सहकार्य करता येईल.

डॉ.सुमय्या राघवन आणि डॉ.आनंद श्रीवास्तव यांनी दूरदृश्यमाध्यमाद्वारे ह

हृदयविकाराचा झटका व कार्डियाक अरेस्ट यातील फरक कसा ओळखणे आणि तीन मिनिटांमध्ये रुग्णाचा उपचार सुरु करणे आवश्यक आहे. याचे चार टप्प्यांमध्ये सादरीकरणाद्वारे प्रशिक्षण दिले. या प्रशिक्षणानंतर आय केअरचे डॉ.यश लोखंडवाला (हृदयरोग तज्ज्ञ), डॉ.ब्रायन पिंटो (कार्डियोलॉजिस्ट), डॉ.किंजल गोयल (मानसोपचारतज्ज्ञ) यांनी यावेळी अकस्मात हृदयरोग या विषयावर मार्गदर्शन केले व वेबिनार मध्ये सहभागी झालेल्यांच्या प्रश्नांना उत्तरेही दिली.

दरम्यान सुरुवातील हृदयविकाराचा झटका किंवा कार्डियाक अरेस्ट या संदर्भातील सीपीआर (कार्डिओ पल्मोनरी रिससिटेशन) प्रशिक्षणाची उपयुक्तता संदर्भात क्रिकेटर सुनील गावस्कर, सिनेअभिनेता आमीर खान, कार्तिक आर्यन, अभिनेत्री भाग्यश्री पटवर्धन यांचा जनजागृतीपर संदेश प्रसारित करण्यात आला.