मुंबई : पूर्वीच्या पिढ्यांमध्ये बव्हंशी राजकीय नेत्यांनाच समाजात आदर्श मानले जायचे. आज मात्र समाजात उद्योग, व्यवसाय, सेवा यांसह सर्व क्षेत्रातील धुरीणांना आदर्श मानले जाते. विविध क्षेत्रातील शीर्ष नेत्यांमुळे राष्ट्रनिर्माणाचे कार्य साध्य होत असते, असे सांगून उद्योग, व्यवसाय क्षेत्रातील धुरीणांनी उच्च नीतिमूल्ये अंगीकारली तर संपूर्ण समाज त्यांचे अनुकरण करेल व त्यातून समाजाची प्रगती होईल, असे प्रतिपादन राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी आज येथे केले.
इंटरनॅशनल ॲडव्हर्टायजिंग असोसिएशनच्या भारतीय शाखेच्या वतीने देण्यात येणारे मार्केटिंग, ॲडव्हर्टायझिंग व मीडिया क्षेत्रातील १८ वे आयएए नेतृत्व पुरस्कार राज्यपालांच्या हस्ते शनिवारी (दि. २४) हॉटेल ताज लँड्स एन्ड, मुंबई येथे प्रदान करण्यात आले, त्यावेळी ते बोलत होते.
कार्यक्रमाला डिस्कव्हरी चॅनेलच्या मुख्याधिकारी मेघा टाटा, लोडस्टार युएम कंपनीच्या मुख्य कार्यकारी अधिकारी नंदिनी डायस, इंटरनॅशनल ॲडव्हर्टायजिंग असोसिएशनचे सहअध्यक्ष भास्कर घोष, एक्सप्रेस समूहाचे अनंत गोयंका प्रामुख्याने उपस्थित होते.
राज्यपालांच्या हस्ते यावेळी आयएए बिझनेस लिडर ऑफ द इयर पुरस्कार अमूल समूहाचे व्यवस्थापकीय संचालक आर एस सोढी, मीडिया एजन्सी ऑफ द इअर पुरस्कार नंदिनी डायस यांना, आयएए एडिटर ऑफ द इयर पुरस्कार इंडियान एक्स्प्रेसचे समूह संपादक राजकमल झा यांना तर मीडिया पर्सन ऑफ द इयर पुरस्कार सोनी पिक्चर्सचे मुख्याधिकारी एन पी सिंह यांना प्रदान करण्यात आला.