नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : देशाच्या आरोग्य सुविधा क्षेत्रात क्रांती घडवण्याची ताकद आयुष्मान भारत डिजिटल अभियानात असल्याचं प्रतिपादन प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी केलं आहे.

या अभियानाचं उद्घाटन दूरदृष्य प्रणालीमार्फत आज केल्यानंतर ते बोलत होते.या अभियानाअंतर्गत प्रत्येक नागरिकाला डिजिटल आरोग्य- ओळखपत्र मिळणार असून त्या आधारे प्रत्येकाच्या आरोग्यविषयक नोंदींचं जतन करता येईल.३ वर्षांपूर्वी पंडीत दीनदयाळ उपाध्याय यांच्या जयंतीदिनी आयुष्मान भारत योजना सुरु करण्यात आली.

त्यानंतर हे डिजिटल अभियान देशातल्या आरोग्य सुविधा क्षेत्राचा चेहरामोहरा बदलून टाकेल असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.देशातल्या गरीब आणि मध्यमवर्गीयांना आरोग्य सेवा सुविधा मिळण्यातल्या अडचणी यामुळे दूर होतील असं प्रधानमंत्री म्हणाले.कोविड महामारीशी लढताना तयार झालेली आरोग्य सेतु, कोविन, इ संजीवनी ही अॅप वरदान ठरली आहेत असं सांगून ते म्हणाले की, आयुष्मान भारत प्रधानमंत्री जन आरोग्य योजनेचा फायदा अनेक गरीब रुग्णांना मिळाला आहे.

निरोगी जीवनासाठी रोगप्रतिबंधक उपाययोजना, तसंच परवडणाऱ्या दरात औषधोपचार हे देशातल्या आरोग्य सेवा क्षेत्राचं उद्दिष्ट आहे. देशातल्या वैद्यकीय सुविधा तसंच डॉक्टर्स आणि वैद्यकीय सेवा कर्मचाऱ्याच्या संख्येत ७-८ वर्षापूर्वीच्या तुलनेत मोठी वाढ झाली आहे, अशी माहिती मोदी यांनी दिली. एम्स सारख्या अद्ययावत आरोग्य संस्थांचं जाळं उभारण्यात येणार असून तीन लोकसभा मतदारसंघात मिळून किमान एक वैद्यकीय महाविद्यालय सुरु करण्यात येईल. ग्रामीण भागात प्राथमिक आरोग्य केंद्रांचं जाळं उभारण्यात येत आहे अशी माहिती त्यांनी दिली.