नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : केंद्र शासित जम्मू आणि काश्मीरचे पोलीस महासंचालक दीलबाग सिंग यांनी काल नवी दिल्लीत केंद्रीय मंत्री डॉक्टर जितेंद्र सिंग यांची भेट घेऊन, या क्षेत्रातल्या सध्याच्या सुरक्षा विषयक स्थितीची माहिती दिली.

जानेवारी २०२० नंतर या क्षेत्रात दहशतवादी घटनांचं प्रमाण २०१९ मधल्या पहिल्या दीड महिन्यांच्या तुलनेत ६० टक्यांनी कमी झालं असल्याची माहिती त्यांनी सिंग यांना दिली. याच काळात दहशतवाद्यांवर अंत्यसंस्कार होत असताना, किंवा दहशतवादावर नियंत्रण मिळवण्याचे प्रयत्न होत असताना, दगडफेक किंवा कायदा आणि सुव्यवस्था बिघडू शकेल अशा प्रकारच्या कोणत्याही घटना घडल्या नसल्याचंही त्यांनी सांगितलं.

या संपूर्ण क्षेत्रात तंत्रज्ञानाधारित तसंच मानवी देखरेखीची यंत्रणा अधिक सक्षम झाली असल्याचं ते म्हणाले. दहशतवादी संघटनांमध्ये सामील व्हायला निघालेल्या, दक्षिण काश्मीरमधल्या ७ तरुणांचं मन वळवून, त्यांना त्यांच्या कुटुंबियांकडे सोपण्यात यश आल्याचंही सिंग यांनी म्हटलं आहे.