मुंबई (वृत्तसंस्था) : नैर्ऋत्य मोसमी पावसाची आगेकूच देशाच्या इतर भागात होत असून येत्या दोन दिवसात मान्सून पूर्ण देशभरात पोहोचेल असं भारतीय हवामानशास्त्र विभागाने म्हटलं आहे. कोकणात आज तर मध्य महाराष्ट्र आणि घाटमाथ्यावर येत्या ५ दिवसात मुसळधार ते अति मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता आहे. हिमाचल प्रदेश, हरयाणा, आणि गुजरातमधेही आज मुळधार पावसाची शक्यता आहे. राजधानी मुंबईत आज सकाळपर्यंत जोरदार पाऊस होता.

नवी मुंबई, ठाणे आणि पालघर जिल्ह्यातही पावसाच्या जोरदार सरी अधून मधून येत होत्या. अनेक ठिकाणी सखल भागात पाणी साचलं असून वाहतुकीला अडथळे येत होते. राज्याच्या विविध भागांमध्ये मुसळधार पावसाची शक्यता हवामान विभागानं वर्तवली आहे. त्यातही नाशिक, पालघर, ठाणे, रायगड, रत्नागिरी, पुणे तसंच सातारा इथं मोठ्या पावसाचा अंदाज वर्तवण्यात आला असल्यानं सावधानतेच्या सूचना देण्यात आल्या आहेत.