नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : चीनमधे कोरोना विषाणूचा प्रादूर्भाव झालेल्या क्षेत्रात भारतानं 15 टन वैद्यकीय साहित्याचं वाटप केलं आहे. भारतीय हवाई दलाचं विमान काल हे साहित्य घेऊन वुहान इथं गेलं होतं. या विमानानं 76 भारतीय आणि 36 परदेशी नागरिकांनाही परत आणलं आहे. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या शेजारी प्रथम’ धोरणानुसार ही कार्यवाही केल्याचं केंद्रीय आरोग्यमंत्री डॉ. हर्षवर्धन यांनी आज नवी दिल्लीत वार्ताहर परिषदेत सांगितलं. आतापर्यंत तीन विमानांच्या साहाय्यानं वुहानमधून 723 भारतीय आणि 43 परदेशी नागरिकांची सुटका करण्यात आली आहे.
जपानच्या योकोहामाजवळ कोरोना विषाणूच्या प्रादुर्भावानंतर थांबवण्यात आलेल्या डायमंड प्रिन्सेस जहाजावरील 119 भारतीयांना आणि पाच परदेशी प्रवाशांना एअर इंडियाच्या विशेष विमानानं परत आणण्यात आलं आहे. त्यांना हरियाणातल्या मानेसार इथं 14 दिवस देखरेखीखाली वेगळं ठेवलं जाणार आहे. 19 भारतीय प्रवासी अजूनही जपानमध्ये असून त्यांना आवश्यक वैद्यकीय साहाय्य जपानकडून मिळत असल्याचं डॉ. हर्षवर्धन यांनी सांगितलं. परराष्ट्र व्यवहार मंत्री डॉ. एस जयशंकर यांनी जपान आणि चीनचे आभार मानले आहेत.