नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : इजिप्तचे माजी अध्यक्ष मोहम्मद होस्नी मुबारक यांचं काल निधन झालं. ते ९१ वर्षांचे होते. इजिप्तवर त्यांची ३० वर्ष सत्ता होती. माजी हवाई दल प्रमुख असलेले मुबारक १४  ऑक्टोबर १९८१ रोजी इजिप्तचे उपाध्यक्ष झाले.

तत्कालिन अध्यक्ष अन्वर सादित यांची इस्लामी दहशतवाद्यांकडून हत्या झाल्यावर आठ दिवसातच ते इजिप्तचे अध्यक्ष झाले. त्यांच्या कारकिर्दीत इजिप्तची अर्थव्यवस्था तर सुधारलीच त्याचबरोबर इस्त्रायलबरोबरची लष्करी कारवाईही थांबली.

११ फेब्रुवारी २०११ रोजी त्यांना पायउतार व्हावे लागले होते. इजिप्तचे अध्यक्ष अब्देल फतह ईल सिसी, इस्त्रायलचे प्रधानमंत्री बेजांमिन नेतान्याहू आणि पॅलेस्टिनचे अध्यक्ष महम्मौद अब्बास यांनी होस्नी मुबारक यांच्या निधनाबद्दल शोक व्यक्त केला आहे.