मुंबई (वृत्तसंस्था) : राज्यातल्या सहा जिल्हा परिषदा आणि त्या अंतर्गतच्या पंचायत समित्यांच्या पोटनिवडणुकांसाठी आज सकाळपासून शांततेत मतदान सुरु झालं असून सर्वत्र चोख पोलीस बंदोबस्त आहे.पालघर जिल्ह्यात आज दुपारी दीड वाजेपर्यंत २९पूर्णांक ७दशांश टक्के मतदान झालं आहे. नंदूरबार जिल्हा परिषदेच्या ११ गटांसाठी आणि तीन पंचायत समितीच्या १४ गटांसाठी आज मतदानाला सुरुवात झाली असून अद्याप ४२ पूर्णांक ५५ शतांश टक्के मतदान झालं आहे. धुळे जिल्हा परिषदेच्या १४ गट आणि पंचायत समितीच्या २८ गणांसाठी आज ५५२ केंद्रावर सकाळी साडे सात वाजता मतदानाला सुरुवात झाली. जिल्ह्यात दुपारी दीड वाजेपर्यंत ३३ पूर्णांक ९१ शतांश टक्के मतदान झालं आहे. नागपूर जिल्ह्यात दुपारी साडेअकरा वाजेपर्यंत जिल्हा परिषदेच्या १६ मतदारसंघात २३पूर्णांक २२ शतांश टक्के तर पंचायत समितीच्या ३१ मतदारसंघात २३ पूर्णांक ८५ शतांश मतदान झाल्याचं आमच्या वार्ताहरानं कळवलं आहे. वाशिम जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या निवडणुकीत आज २३ टक्के मतदान झाल्याचं वृत्त आहे. वाशिम जिल्ह्यातल्या पांगरी महादेव गावाला वारंवार मागणी करूनही ग्रामपंचायत मिळाली नाही ह्याचा निषेध म्हणून जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या पोटनिवडणुकीवर बहिष्कार करण्याचा निर्णय ग्रामस्थांनी घेतल्याचं आमच्या बातमीदारानं कळवलं आहे. अकोला जिल्ह्यातही मतदान शांततेत सुरु असल्याचं आमच्या बातमीदारानं कळवलं आहे. संध्याकाळी पाच वाजेपर्यंत मतदान होणार असून मतमोजणी उद्या होणार आहे.