नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : देशात कोळशाचा पुरेसा साठा उपलब्ध असून वीज पुरवठा खंडित होण्याची कुठलीही शक्यता नसल्याचं कोळसा मंत्रालयानं जारी केलेल्या निवेदनात म्हटलं आहे. कोल इंडियाकडे पुढील २४ दिवसांची मागणी पूर्ण करता येईल इतका कोळसा शिल्लक आहे. त्यामुळे वीज पुरवठ्याबाबतच्या कुठल्याही अफवांवर जनतेनं विश्वास ठेवू नये असं आवाहन केंद्रीय कोळसा मंत्री प्रल्हाद जोशी यांनी केलं आहे. देशातल्या औष्णिक ऊर्जा केंद्रांना दर दिवशी होणारा कोळशाचा पुरवठा वाढवला जात असून मान्सूनचा परतीचा प्रवास संपल्यावर तो आणखी वाढेल असं त्यांनी आपल्या ट्विटर संदेशात म्हटलं आहे. देशातल्या औष्णिक ऊर्जा केंद्रांकडे अंदाजे ७२ लाख टन कोळसा शिल्लक असून तो पुढील ४ दिवस पुरेल. तसंच कोल इंडिया कडे ४०० लाख टन पेक्षा जास्त कोळसा असून औष्णिक ऊर्जा केंद्रांना तो पुरवला जाईल असं कोळसा मंत्रालयानं म्हटलं आहे.