मुंबई (वृत्तसंस्था) :कोरोना संकटामुळे घटलेली प्रवासी संख्या आणि इंधनाच्या वाढत्या किमतीमुळे आलेला आर्थिक बोजा कमी करण्यासाठी एसटी महामंडळानं आपल्या ताफ्यातल्या १ हजार गाड्या सीएनजीमध्ये रूपांतरित करण्याचा निर्णय घेतला आहे, अशी माहिती परिवहनमंत्री आणि एसटी महामंडळाचे अध्यक्ष अनिल परब यांनी दिली आहे. एसटी महामंडळाच्या ताफ्यात डिझेलवर धावणाऱ्या १७ हजार बसगाड्या असून डिझेलवर होणारा खर्च ,एकूण खर्चाच्या ३८ ते ४० टक्क्यांवर पोहोचला आहे. डिझेलला पर्यायी इंधनाचा वापर करण्याचा निर्णय घेऊन लवकरच सीएनजी बरोबरच इलेक्ट्रीक, एलएनजी अशा पर्यावरणपूरक इंधनावर धावणाऱ्या बसेस दाखल होणार आहेत. त्यामुळे भविष्यात इंधनावरील खर्चाच्या बचतीबरोबरच पर्यावरणपूरक प्रवासाला प्राधान्य दिलं जाईल, असं परब यांनी सांगितलं.