नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : काही विशेष स्थितीत महिलांच्या गर्भपातासाठी गर्भपात कालमर्यादा २० आठवड्यांहून २४ आठवड्यांपर्यंत वाढवण्यात आली आहे. केंद्रीय आरोग्य मंत्रालयानं ही माहिती दिली. यासंदर्भातल्या कायद्याला संसदेनं मार्चमध्ये मंजुरी दिली होती. या मध्ये बलात्कार, अत्याचार झालेल्या महिला, अल्पवयीन मुली तसंच नातेवाईक किंवा आप्तांच्या अत्याचाराला बळी पडलेल्या महिला तसंच गर्भावस्थेदरम्यान वैवाहिक स्थिती बदलली आहे अशा महिलांचा समावेश असेल. अशा महिलांची प्रकृती, अर्भकाची शारिरिक अवस्था तसंच मुल जन्माला येणार असेल तर त्यात काही विकृती आहे का याबाबतची खात्री केल्यानंतर गर्भपात करायचा की नाही यासंदर्भातील निर्णय संबंधित वैद्यकीय तज्ञ घेतील असं या नियमावलीत स्पष्ट करण्यात आलं आहे.