मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि ज्येष्ठ शास्त्रज्ञ डॉ. रघुनाथ माशेलकर यांच्यात चर्चा 

मुंबई : नव्या संकल्पना आणि नवे विचार घेऊन नवमहाराष्ट्राची जडणघडण होण्यासाठी ज्येष्ठ शास्त्रज्ञ पद्मविभूषण डॉ.रघुनाथ माशेलकर यांच्यासारख्या शास्त्रज्ञांचे योगदान महत्त्वाचे आहे, असे प्रतिपादन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी केले.

मुख्यमंत्री श्री.ठाकरे यांनी मंत्रालयात डॉ.माशेलकर यांच्याशी नव्या महाराष्ट्राच्या व्हिजनबाबत चर्चा केली. श्री.ठाकरे म्हणाले, राज्यातील युवकांना नवी दिशा देण्यासाठी आणि युवाशक्तीचा राज्याच्या विकासासाठी उपयोग करून घेण्यासाठी त्यांना तंत्रज्ञान युगातील नव्या प्रवाहाची माहिती देणे आवश्यक आहे. कृषी विकासासाठी देखील नव्या तंत्रज्ञानाचा प्रसार आवश्यक आहे. यासाठी पुणे इंटरनॅशनल सेंटरचे सहकार्य उपयुक्त ठरेल, असे त्यांनी सांगितले.

विज्ञान, तंत्रज्ञान आणि नव्या संकल्पनांच्या उपयोगाद्वारे सर्व समावेशक विकासाला गती देणे, राज्याच्या सामाजिक आणि आर्थिक विकासासाठी थिंक टँक म्हणून पुणे इंटरनॅशनल सेंटरचा उपयोग करणे, कृषी क्षेत्रातील आव्हाने आणि शेतकऱ्यांच्या समस्या दूर करण्यासाठी नव्या तंत्राचा उपयोग, रोजगाराला चालना देणाऱ्या प्रगतीच्या दिशेने वाटचाल, स्टार्ट अप, रोजगार आणि संपत्तीच्या निर्मितीत महाराष्ट्र राज्य इनोव्हेशन सोसायटीची भूमिका, जीएसटीमधील सुधारणा अशा विविध विषयांवर यावेळी मुख्यमंत्र्यांनी डॉ.माशेलकर यांच्याशी चर्चा केली.

पुणे इंटरनॅशनल सेंटर राज्याच्या विकासासाठी शासनास सर्व प्रकारचे सहकार्य करेल, असे यावेळी डॉ.माशेलकर यांनी सांगितले.

मुख्यमंत्र्यांनी डॉ.माशेलकर यांना वाढदिवसाबद्दल पुष्पगुच्छ देऊन शुभेच्छा दिल्या.