मुंबई (वृत्तसंस्था) : विजया दशमी आणि धम्मचक्र प्रवर्तन दिन काल सर्वत्र मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. औरंगाबाद शहर आणि जिल्ह्यात जिल्ह्यात ठिकठिकाणी दुर्गा महोत्सव मंडळात महापूजा आणि होमहवन करण्यात आलं. विजयादशमी निमित्त परभणी इथं छत्रपती शिवाजी महाराज चौकातून काढण्यात आलेल्या श्री दुर्गामाता दौडमध्ये, शेकडो युवक, युवती सहभागी झाले होते. परभणीच्या ग्रामीण भागात वैयक्तिक, परिसर आणि हाताची स्वच्छता अबाधित रहावी, असा स्वच्छतेचा संदेश देत, ठिकठिकाणी जागतिक हात धुवा दिनही उत्साहात साजरा करण्यात आला. नांदेड जिल्ह्यात ठिकठिकाणी पारंपारिक पध्दतीनं दसरा सण साजरा करण्यात आला. ठिकठिकाणी मिरवणूक काढून सीमोल्लंघन करून आपट्याच्या सोनं लुटण्यात आलं. सचखंड गुरूद्वाऱ्यात दशहरा महोत्सवानिमित्त देशविदेशातून शीख बांधव सहभागी झाले. सायंकाळी गुरू ग्रंथसाहेब यांची मिरवणूक काढण्यात आली. वजिराबाद महावीर चौकातून प्रतिकात्मक हल्लाबोल करण्यात आला. हिंगोली जिल्ह्यात औंढा नागनाथ इथं नागेश्वराची विजयादशमी निमित्त काढण्यात येणारी पालखी मिरवणूक प्रशासनानं रद्द केली होती, परंतू परंपरा कायम राहावी म्हणून चारचाकी वाहनातून, नागनाथाच्या मुकुटची पालखी मिरवणूक मोजक्याच पुजारी आणि पदाधिकारी यांच्या उपस्थित काढण्यात आली. कोविडच्या पार्श्वभूमीवर चार फुटाच्या रावणाचं दहन करून साध्या पद्धतीने दसरा महोत्सव साजरा करण्यात आला. लातूर इथं पालकमंत्री अमित देशमुख यांनी काल डॉ. बाबासाहेब आंबेडकर पार्क इथं भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून अभिवादन केलं. तुळजापूर इथं तुळजाभवानी देवीचा सीमोल्लंघन सोहळा काल साजरा झाला. त्यानंतर देवीच्या पाच दिवसीय मंचकी निद्रेला प्रारंभ झाला. उस्मानाबाद इथं राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचा विजयादशमी उत्सव साजरा झाला, लातूर विभागाचे प्रचारक राजेश संन्यासी यांनी यावेळी उपस्थितांना मार्गदर्शन करताना, हिंदू संस्कृती रक्षणाचा संकल्प करण्याचं आवाहन केलं. स्मृती बुद्ध विहार समितीच्या वतीने काल सायंकाळी बुद्ध धम्म फेरी काढण्यात आली. बीड जिल्ह्यात अंबाजोगाई इथं, राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचं पथसंचलन उत्साही वातावरणात शिस्त आणि नियोजनबद्धरित्या पार पडलं. धम्मचक्र परिवर्तन दिनानिमित्त भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेला पुष्प अर्पण करत बुद्ध वंदना घेण्यात आली.