मुंबई : प्रबोधनकार ठाकरे यांच्या जीवनकार्याची माहिती विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचवून, यातून त्यांना समाजकार्याची प्रेरणा मिळावी, असे उद्गार मराठी भाषा मंत्री सुभाष देसाई यांनी काढले.
विल्सन महाविद्यालयात प्रबोधनकार ठाकरे यांच्या विचारांवर आधारित कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. त्यावेळी ते बोलत होते. यावेळी प्रबोधनकार यांच्या साहित्याचे वितरण विद्यार्थ्यांना करण्यात आले.
मराठी भाषा मंत्री श्री.देसाई म्हणाले, सर्व महाविद्यालयातून प्रबोधनकार आणि समकालीन चळवळीतील लोकांच्या विचारावर चर्चासत्रे व्हावीत. आजच्या समस्यांवर उपाय शोधण्यासाठी त्यांच्या विचारातून प्रेरणा मिळावी. गुरुजनांनी या विचारवंतांची ओळख नव्या पिढीला करुन द्यावी. प्रबोधनकार ठाकरे यांच्या विचारांचा प्रचार आणि प्रसार व्हावा यासाठी राज्यभर अशा चर्चासत्रांचे आयोजन व्हावे, अशी अपेक्षाही त्यांनी यावेळी व्यक्त केली.