नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : माजी गृहमंत्री अनिल देशमुख आज स्वतःहून ईडी अर्थात सक्तवसुली संचालनालयाच्या कार्यालयात चौकशीसाठी हजर झाले. देशमुख यांना ईडीनं आतापर्यंत पाच वेळा समन्स बजावलं होतं. त्यानंतर ईडी च्या चौकशीपासून आपल्याला दिलासा मिळावा यासाठी देशमुख यांनी दाखल केलेली याचिका गेल्या आठवड्यात मुंबई उच्च न्यायालयानं फेटाळली होती. देशमुख यांच्या विरोधात मुंबईतल्या हॉटेल मालकांकडून शंभर कोटीची वसुली केल्याचा आरोप मुंबईचे माजी पोलीस आयुक्त परमवीर सिंग यांनी केला होता. दरम्यान आपण ई डी ला सहकार्य करत नसल्याचं वृत्त चुकीचं असून ई डी नं छापे टाकले तेव्हा आपल्या संपूर्ण कुटुंबानं पूर्ण सहकार्य केल्याचं ते देशमुख यांनी म्हटलं आहे. परमवीर सिंग यांनी आपल्या विरोधात आरोप केले मात्र तेच सध्या फरार असल्याचं देखील देशमुख म्हणाले.