मुंबई (वृत्तसंस्था) : कोरोना संसर्गचा धोका अजूनही संपलेला नाही, त्यामुळे नागरिकांनी खबरदारी घेत आणि भान ठेवत दिवाळीचा सण साजरा करावं असं आवाहन आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी केलं आहे. ते जालना इथं बातमीदारांशी बोलत होते. दिवाळीच्या सणासाठी खरेदी आणि इतर कारणांमुळे गर्दी वाढली असल्याचं निरीक्षणही टोपे यांनी नोंदवलं. फटाके फोडण्यासंदर्भात पर्यावरण विभागानं दिलेल्या सूचनांचं पालन करावं असं आवाहन त्यांनी केलं. कोविड१९ प्रतिबंधक लशीच्या दोन्ही मात्र घेतलेल्यांना रेल्वेच्या विनाआरक्षित सामान्य डब्यातून प्रवासाची सोय आणि त्यासाठीची तिकटं मिळावीत याबाबत रेल्वेला विनंती करू असं त्यांनी सांगितलं. राज्यात ७५ लाखाहून अधिक पात्र नागरिकांनी लसीची दुसरी मात्रा घेतलेली नाही. त्यांनी ती लवकरात लवकर घ्यावी असं आवाहनही त्यांनी केलं. राज्यात सध्या कोरोनासह, म्युकर मायकोसिसबाधितांचं प्रमाणही नियंत्रणात आहे. म्युकरमायकोसिसच्या रुग्णांआठी महागडी औषधं मोफत दिली जात आहे, हा त्याचाच सकारात्मक परिणाम असल्याचं ते म्हणाले.