मुंबई : ‘अंतराळ आणि अणुऊर्जा क्षेत्रात भारत’ या विषयावरची राष्ट्रीय परिषद येत्या 16 सप्टेंबरला मुंबईतल्या नेहरू विज्ञान केंद्रात होणार आहे. भारतीय अंतराळ कार्यक्रमाचे जनक आणि भारतीय अंतराळ संशोधन संस्थेचे संस्थापक डॉ. विक्रम साराभाई यांच्या 100 व्या जयंतीनिमित्त ही परिषद आयोजित करण्यात आली आहे. नेहरू सेंटर, नॅशनल सेंटर फॉर सायन्स कम्युनिकेटर्स नॅशनल एज्युकेशन सोसायटी यांच्या विद्यमाने ही परिषद होणार आहे. नॅशनल सेंटर फॉर सायन्स कम्युनिकेटर्सचे अध्यक्ष ए.पी.जयरामन्, सरचिटणीस सुहास नाईक-साटम, नेहरू विज्ञान केंद्राचे संचालक शिवप्रसाद खेनेड यांनी मुंबईत घेतलेल्या संयुक्त पत्रकार परिषदेत ही माहिती दिली.

डॉ. विक्रम साराभाई यांच्या सन्मानार्थ चांद्रयान-2 मोहिमेतल्या लॅण्डरला विक्रम हे नाव देण्यात आल्याचे खेनेड यांनी सांगितले.

डॉ. साराभाई यांनी प्रथम विज्ञानात व्यवस्थापन आणले. विज्ञानाबरोबरच अर्थव्यवस्थेला मदत आणि रोजगार निर्मितीवरही त्यांचा रोख होता असे जयरामन म्हणाले.

डॉ. साराभाई यांच्यासोबत काम केलेले किंवा त्यांना व्यक्तीश: ओळखणारे मान्यवर या राष्ट्रीय परिषदेत सहभागी होणार आहेत. डॉ. साराभाई यांच्या कन्या मल्लिका साराभाई याही आपल्या पित्याविषयीच्या आठवणी सांगणार आहेत.

या परिषदेबरोबरच इस्रोचे प्रदर्शनही 15,16 आणि 17 या सप्टेंबरला जनतेला पाहता येणार आहे. डॉ. विक्रम साराभाई यांच्या जीवनावरचा चित्रपटही परिषदेनंतर प्रदर्शित केला जाईल.