नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : पाच दिवसाच्या यशस्वी इटली आणि इंगलंडच्या दौऱ्यावरून प्रधानमंत्री नरेंद्र मोदी आज मायदेशी परतले. त्यांच्या दौऱ्यादरम्यान मोदींनी रोम येथे १६व्या जी-२० परिषदेत सहभाग घेतला. या परिषदेद्वारे कोविड  महामारीतून सुखरूप बाहेर येण्याचा सुदृढ संदेश लोकांना देण्यात आला तसंच आरोग्य, रोजगार, पर्यटन, शिक्षण, अर्थव्यवस्था आणि महत्वाचं म्हणजे वातावरण कृती कार्यक्रमावर चर्चा करण्यात आली. शाश्वत विकास ध्येयाच्या अनुषंगानं शाश्वत उपभोग आणि जबाबदारीयुक्त उत्पादन पद्धतीवर जी-२०च्या रोम जाहीरनाम्यात प्रधानमंत्र्यांच्या विचारसरणीची छाप आढळते. प्रधानमंत्र्यांनी पुरवठा साखळी लसीकरणावरील जागतिक शिखर परिषदेलाही हजेरी लावली. भारत पुढच्या वर्षाअखेरपर्यंत जगासाठी ५ अब्ज कोविड लसींच्या मात्रा तयार करण्यास कटिबद्ध असल्याचं ते म्हणाले.