नवी दिल्ली (वृत्तसंस्था) :देशात युरिया आणि डायअमिनो फॉस्पेटसह सर्व खताचा भरपूर पुरवठा उपलब्ध असेल, अशी ग्वाही केंद्रीय रसायन आणि खत मंत्री मनसुख मांडविय यांनी दिली आहे. नोव्हेंबर महिन्यासाठी खतं उपलब्धतेच्या उद्दिष्टाचा आढावा आपण आधिकाऱ्यांसोबत घेतला आहे. राज्यं आणि केंद्र शासित प्रदेशाकडून खतांची मागणी वाढली असली तरी त्यापेक्षा जास्त खत उपलब्ध आहे, असं त्यांनी सांगितलं. युरियाची मागणी ४१ लाख टनाची आहे, तर ७६ लाख टन युरिया उपलब्ध होणार आहे. डायअमिनो फॉस्पेट गरज १७ लाख टनाची, तर उपलब्धता १८ लाख टनाची आहे. एनपीकेची मागणी १५ लाख टनाची, तर उपलब्धता त्याच्या दुप्पट म्हणजे ३० लाख टनाची आहे, असं त्यांनी सांगितलं. शेतकऱ्यांनी कसल्याही अफवाकडे लक्ष देऊ नये, आणि खतांची साठेबाजी करु नये, असं आवाहन मांडविय यांनी केलं आहे. अफवा पसरवून खतांचा काळाबाजार करणाऱ्याविरुद्ध कडक कारवाई केली जाईल, असा इशाराही त्यांनी दिला आहे.