पणजी येथे केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्या अध्यक्षतेखाली पश्चिम क्षेत्रीय परिषदेची 24 वी बैठक संपन्न

पणजी : पश्चिम क्षेत्रीय परिषद राज्यासाठी सार्थक असून राज्या-राज्यामध्ये आणि केंद्र व राज्यांमध्ये या परिषदेमुळे समन्वय आणि संबंध दृढ होण्यास मदत होत आहे. राज्याचे जे विषय केंद्राकडे आहेत त्याचबरोबर या परिषदेत होणाऱ्या निर्णयाची अंमलबजावणीसाठी महाराष्ट्राचा पूर्ण पाठिंबा राहील,अशी ग्वाही महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिली.

पणजी येथे पश्चिम क्षेत्रीय परिषदेची 24 वी बैठक केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्या अध्यक्षतेखाली झाली. गुजरातचे मुख्यमंत्री व्ही.आर.रुपाणी, गोव्याचे मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत, दादरा व नगर हवेलीचे प्रशासक प्रफुल पटेल,महाराष्ट्राच्या महिला व बाल विकासमंत्री पंकजा मुंडे, जलसंपदामंत्री गिरीष महाजन, मुख्य सचिव अजोय मेहता आदी यावेळी उपस्थित होते.

पोलीस दलाचे आधुनिकीकरण, महिला आणि लहान मुलांवर होणारे लैंगिक अत्याचार,  यातील गुन्ह्याचा तपास जलद गतीने होण्यासाठी करण्यात येत असलेल्या उपाययोजनांचा यावेळी आढावा घेण्यात आला.

जम्मू आणि काश्मीर, लडाख यासाठी ऐतिहासिक निर्णय घेतल्याबद्दल या परिषदेच्या वतीने प्रधानमंत्री, केंद्रीय गृहमंत्री आणि केंद्र शासन यांच्या अभिनंदनाचा ठराव महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मांडला. त्याला गोव्याचे मुख्यमंत्री डॉ. सावंत यांनी अनुमोदन दिले.

पश्चिम क्षेत्रीय परिषदेतील निर्णयांमुळे देशाची संघीय व्यवस्था मजबूत – केंद्रीय गृहमंत्री अमित शहा

केंद्रीय गृहमंत्री श्री. शहा यावेळी म्हणाले, या परिषदेतील निर्णय देशाच्या संघीय व्यवस्थेला मजबूत करतील. केंद्र आणि राज्यामधील प्रश्न सोडविले जातील.

पोलिस दलातील रिक्त पदं भरावीत. कुशल मनुष्यबळासाठी प्रशिक्षण व्यवस्थाही आजपासून सुरु करावी. त्यामुळे गुन्हेगारांना होणाऱ्या शिक्षेच्या प्रमाणात 25 टक्के वाढ होईल,असेही श्री. शहा यांनी सांगितले.

विशेष सचिव संजीव गुप्ता यांनी यावेळी सादरीकरण केले. बैठकीला गोव्याचे महिला व बाल विकासमंत्री फिलीप रॉट्रीग्ज, सांस्कृतिकमंत्री गोविंद गावडे,गुजरातचे उपमुख्यमंत्री नितीन पटेल, गृहराज्यमंत्री पी.बी.पटेल आदींसह विविध सचिव, अधिकारी उपस्थित होते.