नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाने ‘स्मार्टर डिजिटल पेमेंट्स’ या थीमसह ‘हार्बिंगर २०२१ – इनोव्हेशन फॉर ट्रान्सफॉर्मेशन’ या पहिल्या जागतिक हॅकाथॉनची घोषणा केली आहे. संगणक आणि इंटरनेटद्वारे पैशांची देवाण घेवाण करताना अधिक सुरक्षितता मिळावी, व्यवहार करणं सुलभ असावं या हेतूनं नवनवीन कल्पना आणि तंत्र बनवण्याला प्रोत्साहन देण्यासाठी या स्पर्धेचं आयोजन करण्यात आलं आहे. छोट्या रक्कमेच्या व्यवहारांसाठी पर्यायी ऑथेंटीकेशन, समाजमाध्यमांच्या मंचावर होणाऱ्या आर्थिक व्यवहारांवर देखरेख ठेवून गैर व्यवहाराला आळा घालण्यासाठी उपाय, असे विषय स्पर्धकांना निवडता येतील. या उपक्रमाला हार्बिंगर २०२१ – कायापालटासाठी अभिनव मार्ग असं नाव देण्यात आलं असून अधिक सफाईदार डिजिटल पेमेंट्स ही स्पर्धेची संकल्पना आहे. येत्या १५ नोव्हेंबरपासून स्पर्धकांना प्रवेशाची नोंदणी करता येईल. स्पर्धेच्या विजेत्याला ४० लाख तर उपविजेत्याला २० लाख रुपयांचं पारितोषिक देण्यात येईल असं रिझर्व बँकेनं म्हटलं आहे.