नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : दहशतवादाच्या वाढता आव्हानांविरोधात आंतरराष्टीय समुदायानं एकत्र यायला हवं, असं प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी म्हटलं आहे. गुजराथ मधल्या केवाडीआ  इथं स्टॅच्यू ऑफ युनिटी’ जवळ आयोजित ‘राष्ट्रीय एकता दिवस’ समारंभात ते बोलत होते. विश्वाच्या प्रगती आणि शांती साठी सा-या जगाची एकजूट आवश्यक असल्याचंही मोदी म्हणाले.

भारतानं दहशतवादविरोधी लढ्यात अनेक निष्पाप जीव गमावले असून पुलवामा सारख्या घटनेचं राजकारण न करता देश हितालाच प्राधान्य द्यायला हवं असंही ते म्हणाले. सर्व अडथळे दूर झाल्यामुळे जम्मू-काश्मीर विकासाच्या मार्गावर जात आहे तसंच शांती समझोत्यामुळे ईशान्य भारतही प्रगतीपथावर आहे असं ते म्हणाले.

देशातले शेतकरी, कष्टकरी आणि गरिबांच्या कल्याणासाठी आणि त्यांना आत्मनिर्भर बनवण्यासाठी सरकार काम  करत आहे. संरक्षण क्षेत्रात भारत स्वावलंबी बनत आहे असं सांगून त्यांनी सीमावर्ती भागात रस्ते, पूल, बोगदे उभारून विकास केला जात आहे या कडे लक्ष वेधलं. प्रधान मंत्र्यांनी कोरोना योद्धांचाही गौरव केला.

त्याआधी, मोदी यांनी सरदार पटेल यांच्या स्मृतींना अभिवादन केलं. त्यावेळी झालेल्या संचलनात भारतीय हवाई दलाच्या विमानांनी हवेत झेपावत सहभाग घेतला.