मुंबई (वृत्तसंस्था) : कोविड१९ प्रतिबंधक लसीकरण मोहीमेअंतर्गत शासनानं मुंबई महानगरपालिकेला लसीच्या पहिल्या मात्रेसाठी दिलेलं लक्ष्य पालिकेनं आज सकाळी गाठलं. जनगणनेच्या सांख्यिकीच्या आधारे आणि पात्र नागरिकांची संख्या लक्षात घेऊन शासनानं पालिकेला ९२ लाख ३६ हजार ५०० पात्र नागरिकांचं पूर्ण लसीकरण करण्याचं उद्दिष्ट दिलं आहे. या लसीकरण मोहीमेच्या आज ३०२व्या दिवशी सकाळच्या सत्रादरम्यान मुंबई पालिकेनं, आत्तापर्यंत एकूण ९२ लाख ३९ हजार ९०२ नागरिकांना लसीची पहिली मात्रा देत, दिलेल्या उद्दिष्टाअंतर्गत पहिल्या मात्रेसाठीची संख्या पार केली. मुंबईत आजच्या दिवशी दुपारपर्यंत ५९ हजार ६०५ लसमात्रा दिल्या आहेत. याबरोबरच बृहन्मुंबई महानगरपालिका क्षेत्राअंतर्गत आत्तापर्यंत एकूण १ कोटी ५२ लाखाहून अधिक लसमात्रा लाभार्थ्यांना दिल्या आहेत. यापैकी ६० लाखाहून अधिक जणांना लसीच्या दोन्ही मात्रा मिळाल्या आहेत. निर्धारीत लक्ष्यसंख्येला लसीची पहिली मात्रा देऊन झाली असली, तरी या सगळ्या नागरिकांना लसीची दुसरी मात्रा देत संपूर्ण उद्दिष्टपूर्ती व्हावी यासाठी पालिका प्रयत्नशील असल्याचं पालिकेचे आयुक्त इकबाल सिंह चहल आणि अतिरिक्त आयुक्त सुरेश काकाणी यांनी म्हटलं आहे. दुसरी मात्रेसाठी पात्र असलेल्या नागरिकांनी पुढे येत लस घ्यावी असं आवाहनही त्यांनी केलं आहे.