नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : वापरात नसलेल्या आणि क्षमतेपेक्षा कमी वापर होत असलेल्या मालमत्तांचं रोखीकरण करायचा धाडसी निर्णय केंद्र सरकारनं घेतला, त्यामुळेच देशाच्या अर्थव्यवस्थेला नव्यानं उभारी देणारे बदल घडून घेत आहेत, आणि जगभरात भारताच्या या निर्णयाचं स्वागत केलं जात आहे, असं प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी म्हटलं आहे. ते आज पहिल्या लेखापरिक्षण दिनानिमीत्त, नियंत्रक आणि महालेखापरिक्षक अर्थात कॅगच्या दिल्ली इथल्या कार्यालयात झालेल्या कार्यक्रमात बोलत होते. कॅग ही भारताच्या विकासप्रक्रियेतली महत्वाची संस्था आहे, कॅगनं भारताच्या उत्पादन आणि क्षमता वृद्धीत महत्वाची भूमिका बजावली आहे असं ते म्हणाले. कोणत्याही व्यवस्थेत सुधारणा आणि पारदर्शकता महत्वाची असते. त्यादृष्टीनंच सरकार सेवांचा पुरवठा आणि वितरणाकरता संपर्कविरहित, स्वयंचलित पद्धतींचा अवलंब करत आहे, ऑनलाइन अर्जांमुळे सरकारचा अनावश्यक हस्तक्षेप संपुष्टात आला आहे असं ते म्हणाले. कॅग या संस्थेची ऐतिहासिक स्थापना, आणि या संस्थेनं प्रशासन, पारदर्शकता आणि उत्तरदायित्वात याबाबतीत दिलेलं महत्वाचं योगदान अधोरेखित करणासाठी लेखापरीक्षण दिवस साजरा केला जात आहे. या कार्यक्रमाआधी प्रधानमंत्र्यांनी कॅगच्या कार्यालयात सरदार वल्लभभाई पटेल यांच्या पुतळ्याचं अनावरण केलं. देशाचे नियंत्रक आणि महालेखापरिक्षक गिरीश चंद्र मुरमु हे देखील या कार्यक्रमाला उपस्थित होते.