नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : देशभरात राबवलं जाणारं नवं शैक्षणिक धोरण युवकांमधे निर्मितीची कौशल्य वाढवेल, तसंच प्रादेशिक भाषांना बळ देईल असा विश्वास राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांनी व्यक्त केला आहे. ते आज कानपूर इथं हारकोर्ट बटलर तांत्रिक विद्यापिठाच्या शताब्दी सोहळ्यात बोलत होते. संशोधन आणि वैज्ञानिक शिक्षण प्रादेशिक भाषांमधे करायला उत्तेजन देण्याची शिफारस या शैक्षणित धोरणात असल्यानं हे धोरण आपल्या देशाला ज्ञानाच्या क्षेत्रातली महाशक्ती बनवण्यात महत्त्वाची भूमिका बजावेल असं ते म्हणाले. तांत्रिक शिक्षणाच्या क्षेत्रात जाण्यासाठी मुलींना प्रोत्साहन दिलं पाहिजे, असंही राष्ट्रपती म्हणाले.