नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : देशातले तीन कृषी कायदे मागे घेणारं विधेयक आज लोकसभेत आवाजी मतदानानं संमत करण्यात आलं. यावेळी विरोधकांनी चर्चेची मागणी करत गदारोळ केला. त्या गदारोळातच हे विधेयक संमत करण्यात आलं. यावेळी झालेल्या गदारोळामुळे नंतर लोकसभेचं कामकाज दुपारी अडीच वाजेपर्यंत स्थिगीत करण्यात आलं. संसदेच्या हिवाळी अधिवेशनाच्या आजच्या पहिल्याच दिवशी विरोधकांनी विविध मुद्द्यांवरुन घातलेल्या गोंधळामुळे लोकसभेचं कामकाज आधी १२ वाजेपर्यंत तर नंतर २ वाजेपर्यंत स्थगित करण्यात आलं. आज सकाळी कामकाज सुरु झाल्यानंतर लोकसभेच्या नवनिर्वाचित सदस्यांनी शपथ घेतली. त्यानंतर शोकप्रस्ताव ठेवण्यात आला. त्यानंतर सभापती ओम बिर्ला यांनी प्रश्नोत्तराचा तास सुरु केला. त्यानंतर विरोधकांनी हौद्यात उतरुन किमान आधारभूत किंमतीबाबत जोरदार घोषणाबाजी केली. या गोंधळामुळे सभागृहाचं कामकाज १२ वाजेपर्यंत स्थगित करण्यात आलं. त्यानंतर दुपारी १२ वाजता सभागृहाचं कामकाज पुन्हा सुरु झालं. यावेळी ३ कृषी कायदे मागे घेणारं विधेयक केंद्रिय कृषी मंत्री नरेंद्र सिंग तोमर यांनी सभागृहापुढे ठेवलं. या विधेयकावर चर्चा करण्याची मागणी करत गोंधळ घालायला सुरुवात केली. या गोंधळातच हे विधेयक संमत करण्यात आलं. हा गोंधळ वाढल्यावर पुन्हा सभागृहाचं कामकाज २ वाजेपर्यंत स्थगित करण्यात आलं.