मुंबई (वृत्तसंस्था) : राज्य विधिमंडळाचे हिवाळी अधिवेशन येत्या २२ डिसेंबर ते २८ डिसेंबर दरम्यान मुंबईत होणार आहे. मुंबईत झालेल्या विधिमंडळ कामकाज सल्लागार समितीच्या बैठकीत आज हा निर्णय घेण्यात आला. या बैठकीत अधिवेशनाचं कामकाज एक आठवड्याचं निश्चित करण्यात आलं असून पुढच्या कामकाजासंदर्भात २४ डिसेंबरला विधिमंडळ कामकाज सल्लागार समितीची बैठक घेऊन निर्णय घेण्यात येईल, अशी माहिती विधीमंडळ कार्यमंत्री अनिल परब यांनी या बैठकीनंतर वार्ताहरांशी बोलताना दिली. अधिवेशन कालावधीत पूर्ण लसीकरण म्हणजे कोविडप्रतिबंधात्मक लसीच्या दोन्ही मात्रा घेतलेल्यांनाच प्रवेश तसंच आरटीपीसीआर चाचणी देखील अनिवार्य करण्यात आली आहे. दर आठवड्याला ही चाचणी होणार आहे. अधिवेशन काळात विधानभवनात खासगी व्यक्तींना प्रवेश दिला जाणार नाही. मंत्री, राज्यमंत्री यांच्या सोबत केवळ एकाच अधिकाऱ्याला प्रवेश दिला जाणार असून विधानमंडळ सदस्यांचे स्वीय सहाय्यक, वाहनचालकांसाठी विधान भवनाच्या बाहेरील प्रांगणात स्वतंत्र व्यवस्था राहणार आहे. यावर प्रतिक्रिया देताना अधिवेशनाला सामोरं जाण्याची सरकारची मानसिकताच नाही, अशी टीका विधानसभेचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी या बैठकीनंतर वार्ताहरांशी बोलताना केली. या अधिवेशनाचा कालावधी वाढवण्याची मागणी या बैठकीत केल्याचं त्यांनी सांगितलं. या अधिवेशनात किमान रोज प्रश्नोत्तरे आणि लक्षवेधी घेण्याची आमची मागणी मान्य केल्याचं फडणवीस म्हणाले. गेली सलग दोन वर्ष हिवाळी अधिवेशन नागपूरला झालेलं नाही, त्यामुळे विदर्भात प्रचंड रोष आहे, सध्या मुख्यमंत्र्याची प्रकृती ठीक नसल्यामुळे ते मुंबईत घ्यावं लागत आहे, मात्र मार्चमधील अर्थसंकल्पीय अधिवेशन नागपुरात घ्यावं अशी मागणी केल्याचं देवेंद्र फडणवीस यांनी यावेळी सांगितलं.