मुंबई (वृत्तसंस्था) : रात्रभर अविरत सुरू असलेला कवी कट्टा आणि सकाळी झालेलं गझल संमेलन त्याचबरोबर प्रथमच आयोजित बालकुमार साहित्य संमेलनासह अन्य वेगवेगळ्या उपक्रमांनी ९४ व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचा दुसरा दिवस रंगला. काल रात्री कवी कट्ट्याचे उद्घाटन ज्येष्ठ साहित्यिक वात्रटिकाकार रामदास फुटाणे यांच्या हस्ते करण्यात आलं. स्वातंत्र्यवीर सावरकर कवी कट्ट्यावर रात्री रंगलेल्या या सोहळ्याचे प्रमुख पाहुणे म्हणून आयपीएस अधिकारी दत्ता कराळे यांच्यासह अन्य मान्यवर उपस्थित होते. यावेळी कवितेचे महत्व सांगताना रामदास फुटाणे यांनी कविता ही नाटकापेक्षा मनोरंजक आणि किर्तनापेक्षा प्रबोधनकारक असून कविता सादर करणे ही कवीची जबाबदारी असल्याचे सांगितले. कवी गोविंद कट्ट्यावर आज गझल संमेलनही रंगले. ज्येष्ठ प्रशासकीय अधिकारी दिलीप पांढरीपट्टे यांनी त्याचे उद्घाटन केले. कविता दुर्बेाध असू शकते. मात्र गझल ही सोपी असली पाहिजे, असे मत पांढरीपट्टे यांनी व्यक्त केले. दरम्यान रामदास भटकळ यांची मुलाखत, तसंच. ऐसी अक्षरे अंतर्गत अच्युत पालव यांनी सादर केलेल्या सुलेखन प्रात्यक्षिकांना उस्फुर्त प्रतिसाद मिळाला. आजची मुलं अधिक स्मार्ट झाली आहेत, त्यांनी आपल्यातले कलागुण झाकून न ठेवता व्यक्त केले पाहिजेत, असं मत ज्येष्ठ अभिनेते दिलीप प्रभावळकर यांनी व्यक्त केलं. बालकुमार साहित्य संमेलनाच्या उद्घाटनप्रसंगी ते बोलत होते. मुलांनी पुस्तकांची आणि साहित्याची संगत सोडू नये तसेच लिखाणात सातत्य ठेवावं असा आवाहन त्यांनी केलं.