मुंबई (वृत्तसंस्था) : सोलापूर जिल्हा परिषदेचे शिक्षक रणजितसिंह डिसले यांना अमेरिकन सरकारकडून दिली जाणारी प्रतिष्ठित ‘फुलब्राईट शिष्यवृत्ती’ जाहीर झाली आहे. यावर्षी जगभरातल्या एकूण ४० शिक्षकांना ही प्रतिष्ठेची शिष्यवृत्ती जाहीर करण्यात आली आहे. ‘पीस इन एज्युकेशन’ या विषयावर अमेरिकेतल्या विद्यापीठात अधिक संशोधन करण्यासाठी त्यांना ही शिष्यवृत्ती जाहीर करण्यात आली आहे. ‘लेट्स क्रॉस द बॉर्डर’ या उपक्रमाच्या माध्यमातून जगभरातल्या अशांत देशांमधल्या मुलांना एकत्र आणून त्यांच्यात अहिंसेच्या विचारांचा प्रसार करण्याचं काम डिसले करत आहेत. या शिष्यवृत्तीमुळे या विषयावर अधिक संशोधन करण्याची संधी मिळत असल्याचा अधिक आनंद झाल्याची प्रतिक्रिया डिसले गुरुजींनी दिली.