नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : संसदेच्या दोन्ही सभागृहांचं कामकाज आज निर्धारित वेळेपेक्षा एक दिवस आधी अनिश्चित काळाकरता स्थगित झालं. संसदेचं हिवाळी अधिवेशन २९ नोव्हेंबरला सुरु झालं होतं आणि ते उद्यापर्यंत चालणार होतं. शेतकरी प्रश्न, लखीमपूर खेरी घटना, बारा खासदारांचं निलंबन, इत्यादी मुद्द्यांवर विरोधकांनी केलेल्या गदारोळामुळे लोकसभेच्या तसंच राज्यसभेच्या कामकाजात सतत व्यत्यय येत राहिला. हिवाळी अधिवेशनात लोकसभेत ८२ टक्के काम झालं, नऊ विधेयकं संमत झाली, आज सकाळी लोकसभेचं कामकाज सुरु होताच सभापती ओम बिर्ला यांनी निरोपाच्या भाषणात सांगितलं. विरोधकांच्या गदारोळामुळे कामकाजाचे १९ तास वाया गेले, असंही ते म्हणाले. राज्यसभेत अपेक्षित कामकाज होऊ शकलं नाही, असं अध्यक्ष एम. व्यंकय्या नायडू निरोपाच्या भाषणात म्हणाले. सभागृहात झालेली घटना चुकीची होती. यापेक्षा चांगलं कामकाज होऊ शकलं असतं, यावर सदस्यांनी विचार करावा, असं आवाहन त्यांनी केलं. लोकसभेत सादर झालेल्या आणि त्यानंतर मंजूर झालेल्या विधेयकांबद्दल सभापती ओम बिर्ला यांनी अधिक माहिती दिली.