मुंबई (वृत्तसंस्था) : एस टी महामंडळाच्या ज्या कर्मचाऱ्यांनी आत्महत्या केल्या त्या ५७ कर्मचाऱ्यांच्या वारसांना नोकरी देण्याबाबत सकारात्मक आहोत असं आज परिवहन मंत्री अनिल परब यांनी विधानसभेत प्रश्नोत्तराच्या तासात स्पष्ट केलं. याबाबत महामंडळाला सूचना देण्यात आल्या आहेत, असंही ते म्हणाले. २५ हजार कर्मचारी कामावर हजर झाले आहेत, बाकीच्यांनी ही व्हावं असं परब यांनी अन्य एका प्रश्नाच्या उत्तरात सांगितलं. १२ हजार कोटी रुपयांचा संचित तोटा असतानाही या संपामुळे ६५० कोटींचे आणखी नुकसान झाल्याची माहिती त्यांनी दिली. मुंबईच्या भांडुप इथल्या सावित्रीबाई फुले मॅटेर्निटी होममध्ये वातानुकूलन यंत्रणा खराब झाल्यामुळे चार बालके मृत्यूमुखी पडली. या मृत्यूसाठी जबाबदार म्हणून मुंबई महापालिकेचे संबंधित वैद्यकीय अधिकाऱ्याला निलंबित करण्याची घोषणा नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे यांनी आज विधानसभेत केली. या प्रकरणाची उच्चस्तरीय चौकशी करण्यात येईल, असंही त्यांनी जाहीर केलं. विरोधी पक्षनेते देवेंद्र फडनवीस यांनी हा विषय एका स्थगन प्रस्तावाच्या सूचनेच्या माध्यमातून मांडला होता. उपाध्यक्ष नरहरी झिरवाळ यांनी त्यावर तातडीनं चर्चा करण्याची मागणी फेटाळून लावली.
समाजवादी पाटीचे सदस्य अबू आझमी यांनी उच्च न्यायालयानं मान्य केलेलं मुस्लीम समाजाचं पाच टक्के शैक्षणिक आरक्षण तातडीनं देण्याची मागणी केली. अल्पसंख्याक विकास मंत्री यांनी त्यावर बोलताना असं आरक्षण देता येणं शक्य नसल्याचं स्पष्ट केलं. पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे यांना व्हॉट्स एपवर धमकी दिल्याच्या प्रकरणी पोलिसांनी कर्नाटकाच्या बेंगळुरू इथून जयसिंग रजपूत या व्यक्तीला अटक केली आहे. अशा घटना पुन्हा घडू नयेत यासाठी राज्यस्तरावर उपाययोजना सुचवण्यासाठी एक विशेष तपास समिती नेमली जाईल, अशी घोषणा गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांनी आज विधानसभेत दिली. भाजपाचे आमदार सुधीर मुनगंटीवार यांनी यावर आमदारांची समिती नेमावी, अशी मागणी केली होती. मात्र ती फेटाळण्यात आली.