पिंपरी : आता पितृ पंधरवडा सुरू असल्याने काळाची गरज ओळखून पितृपक्षाच्या काळात समाजहितासाठी दक्ष होण्याची गरज आहे. पितृपंधरवड्यात श्राद्ध करण्यापेक्षा गरजू संस्था आणि गरजवंत व्यक्तींसाठी आपल्या कुवतीनुसार साह्य करून किंवा भोजन द्यावे, असे आवाहन भाजप शहराध्यक्ष व आमदार लक्ष्मण जगताप यांनी बुधवारी (दि. १८) केले. त्यातून आपल्या पूर्वजांच्या आणि आई-वडिलांच्या स्मृती जपण्यात वेगळ्याच प्रकारचे समाधान लाभेल, असेही ते म्हणाले.

पिंपरी येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर पुतळ्याशेजारील कामगार नाक्यावर केंद्र सरकारच्या अटल आहार योजनेअंतर्गत नोंदित बांधकाम कामगारांसाठी आमदार लक्ष्मण जगताप यांच्या हस्ते मध्यान्ह भोजन योजनेचा शुभारंभ करण्यात आला. आमदार जगताप यांच्या हस्ते बांधकाम कामगारांना भोजन देण्यात आले. त्यावेळी ते बोलत होते. यावेळी जिल्हा कामगार संघटनेचे सदस्य जयंत शिंदे, भाजप शहर सरचिटणीस संजय मंगोडेकर, सचिन गुंजाळ आदी उपस्थित होते.

आमदार जगताप म्हणाले, “केंद्र सरकारने हातावरचे पोट असणाऱ्या बांधकाम कामगारांना पोटभर जेवण मिळावे यासाठी अटल आहार योजना सुरू केली आहे. या योजनेची पिंपरी-चिंचवड शहरात चांगली सुरूवात झाली आहे. जास्तीत जास्त बांधकाम कामगारांना योजनेचा लाभ मिळाला पाहिजे. गोरगरीबांसाठी अशा योजना राबविताना दुसरीकडे सध्या सुरू असलेल्या पितृ् पंधरवड्याच्या परंपरेचाही विचार व्हायला हवा. पितृ पंधरवड्यात आपल्या पूर्वजांच्या नावे श्राद्ध करून पितरं जेवायला घातले म्हणजे आत्म्याला शांती मिळते हा समज आपल्यात रूढ झाला आहे. कित्येकदा ऐपत नसतानाही कर्ज काढून किंवा उसनवारे घेऊन पितरं जेवायला घातली जातात.

मात्र सध्याच्या काळात पितरं जेवायला घालणे योग्य आहे का?, असा प्रश्न यानिमित्ताने उपस्थित होतो. श्राद्ध करून आणि जेवणावळी घालून मृत व्यकीच्या आत्म्याला शांती मिळते, असे आपण मानतो. त्यापेक्षा ज्यांना आवश्यकता आहे अशा गरजूंपर्यंत काही मदत पोहोचवता आली तर आपल्या पूर्वजांना बरे वाटेल हा आपल्याच पूर्वजांनी रुजवलेला संस्कार आचरणात आणला पाहिजे. रुंढी-परंपरांचे अनुकरण करत असताना त्यात काळानुरूप बदल घडताना दिसत आहेत. पारंपारिक पद्धतीने श्राद्ध करण्यापेक्षाही स्वतःच्या कुटुंबातील व्यक्तींच्या स्मृतीप्रित्यर्थ समाजामध्ये विधायक काम करणाऱ्या संस्था, गरजू व्यक्ती यांना मदत देण्याकडे समाजाचा कल वाढला पाहिजे. हा सकारात्मक बदल निश्चितच होत आहे, असा विश्वास आमदार जगताप यांनी व्यक्त केला.”